जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश
जळगांव ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून जिल्ह्यात “आयुष्यमान भारत योजना लाभप्राप्त दवाखान्यांची यादी” ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर लावण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील ११५९ ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ उपलब्ध असलेल्या ९० दवाखान्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे गावपातळीवर नागरिकांना सहजपणे माहिती मिळणार असून, योजना लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल स्वतः या मोहिमेचा नियमित आढावा घेत असून, प्रत्येक ग्रामपंचायतीकडून यादी नोटीस बोर्डवर चिकटविल्याचे छायाचित्र मागवून खात्री केली जात आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या परिसरातील आयुष्यमान भारत लाभप्राप्त दवाखान्यांची माहिती मिळणार आहे तसेच विविध आजारांवर मोफत व सुलभ उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम म्हणजे शासनाच्या आरोग्य सेवांचा खरा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
देशातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार रुग्णालयीन सेवा पुरवणे, ही उद्दिष्ट आहे. भारतातील सुमारे 10 कोटी कुटुंबे (५० कोटी नागरिक) या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. महाराष्ट्रातही ही योजना राबवली जात आहे.
योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
1. दरवर्षी रु. 5 लाखांपर्यंत मोफत रुग्णालयीन उपचार – एका कुटुंबासाठी.
2. सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा.
3. 1350 पेक्षा जास्त रोगांवर मोफत उपचार – जसे की हृदयरोग, कॅन्सर, मूत्रपिंड विकार, अपघाती उपचार इ.
4. कॅशलेस (Cashless) आणि पेपरलेस (Paperless) प्रक्रिया.
5. उपचारासाठी रुग्णालयात भरती होण्यापूर्वी व नंतरची देखील सेवा (pre and post hospitalization).
6. ई-कार्डद्वारे ओळख – लाभार्थीला आधार कार्ड/राशन कार्ड द्वारे ओळखले जाते.
कोणत्या प्रकारचे उपचार मिळतात?
• सर्जरी (हृदय, मेंदू, डोळे, मूत्रपिंड, हाडे इ.)
• प्रसूती सेवा
• कॅन्सर, किडनी डायलेसिस
• अपघातानंतरचे उपचार
• बालरोग व स्त्रीरोग
• मेंदू विकार, दमा, मधुमेह
योजना लाभ मिळवण्यासाठी काय करावे?
1. जवळच्या सेवा केंद्रावर (CSC) किंवा आरोग्य सहाय्यक केंद्रात जाऊन नाव तपासावे.
2. पात्र असल्यास आयुष्मान भारत कार्ड तयार करून घ्यावे.
3. लाभार्थी रुग्णालयात दाखल झाल्यास कॅशलेस सेवा मिळू शकते.
4. अधिक माहिती: https://mera.pmjay.gov.in
महाराष्ट्रातील अंमलबजावणी:
महाराष्ट्रात ही योजना “महात्मा फुले जन आरोग्य योजना” याच्यासोबत एकत्रितपणे राबवली जाते. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दोन्ही योजनांचे लाभ मिळू शकतात.