भडगाव गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समिती स्थापन करण्याचे तातडीने आदेश देऊन ती समिती स्थापन व्हावी, असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळ समिती, भडगाव यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव तालुका हद्दीतील सर्व गावांमध्ये गाव तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम शेतरस्ता समिती स्थापन करून ती कार्यन्वित करणे गरजेचे आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाने तसा शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे. या शासन निर्णयामध्ये नमुद केलेप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर आराखडा ग्रामविकास अधिकारी यांनी कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक गावामध्ये ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करून तीचा रस्त्यांबाबतचा सातत्याने अहवाल घेणे गजरेचे आहे. या ग्रामशेतरस्ता समिती कुठल्याच गावामध्ये कार्यान्वित नसल्याने बहुतांश गावांमध्ये रस्त्यांचे वाद मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न होत आहे. हे वाद ग्रामशेतरस्ता समिती स्थापन करून गाव पातळीवरच मिटविण्यात यावेत. असे शासन निर्णयानुसार शासनाने सांगितलेले आहे. निवेदनावर शरद पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम पाटील, श्रावण जाधव, लक्ष्मण बोरसे वाडे, दिनकर पाटील, निळकंठ पाटील, गुलाब पाटील आदींसह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.