सामाजिक संस्थांच्या मदतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचा विक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – “रक्तदान हेच महादान” या उदात्त भावनेला जळगावकरांनी पुन्हा एकदा कृतीत उतरवले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील रक्तकेंद्राने २०२५ या वर्षात ५ हजारपेक्षा जास्त रक्तदात्यांकडून रक्तदान स्वीकारून एक नवा आणि विक्रम प्रस्थापित केला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनची ही सर्वात मोठी उपलब्धी ठरली आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जळगावकर रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहकार्याने हे यश संपादन झाले आहे. महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या अखंड प्रयत्नांचे हे फळ आहे. रक्तकेंद्राने नियमितपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांना विद्यार्थी, युवक, शासकीय कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले की, “ही केवळ आकडेवारी नाही, तर समाजाच्या आरोग्याबद्दलच्या जागृतीचे प्रतीक आहे. प्रत्येक रक्तदात्याच्या योगदानामुळे रूग्णालयात येणाऱ्या शेकडो गोरगरीब रुग्णांचे, तसेच गरोदर व प्रसूत महिलांचे प्राण वाचले आहेत.” याव्यतिरिक्त, थॅलेसेमीया व सिकलसेल रुग्णांसाठी देखील वेळेवर पुरेसा रक्तसाठा उपलब्ध राहिला.
पॅथोलोजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दिपक शेजवळ यांनी रक्तदात्यांचे आभार मानत “रक्तदान हे सामाजिक बांधिलकीचे कार्य आहे,” असे स्पष्ट केले आणि पुढील वर्षी हा विक्रम अधिक वाढविण्याचा संकल्प व्यक्त केला.
यंदा पहिल्यांदाच नियमित रक्तदान शिबिरे आयोजित करणाऱ्या सामाजिक संस्था व रक्तदात्यांना रक्तगटाचे संशोधक ‘सर कार्ल लँडस्टीनर’ यांच्या नावाने पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. सर्वाधिक रक्तसंकलन करणाऱ्या प्रमुख संस्थांमध्ये सुप्रीम इंडस्ट्रीज, जळगावचे एम.आय.डी.सी. व गाडेगाव युनिटने ६००, जगतगुरु नरेंद्राचार्य संस्थानतर्फे ३०१, महाराष्ट्र केमिस्ट व ड्रगीस्ट एसोसिएशन जळगावतर्फे २५०, संत निरंकारी मंडळतर्फे २५०, औष्णिक वीज निर्मिती केंद्र वसाहत, दीप नगर, भुसावळ |
येथे १९१ रक्तसंकलन झाले आहे.
या उल्लेखनीय उपक्रमात रक्तकेंद्राचे विभाग प्रमुख डॉ. कविता पाटील, डॉ. कुणाल देवरे, डॉ. श्रुती उमाळे, डॉ. भावेश खडके, डॉ. श्रद्धा गायगोळ, डॉ. राहुल पाटील, जनसंपर्क अधिकारी प्रदीप पाडवी तसेच तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने या यशाबद्दल रक्तकेंद्राचा गौरव करत अभिनंदन केले आहे. आगामी वर्षात ही संख्या आणखी वाढवण्याचा निर्धार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमने व्यक्त केला आहे.









