जळगाव शहरातील शेरा चौक घटनेप्रकरणी मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन यांनी त्यांच्या घरावर गोळीबार करवून घेतल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार त्यांचा लहान मुलगा आणि एका गुन्हेगाराला मालेगाव येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्यांना उद्या दि. १० डिसेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
शेख अहमद हुसेन हे अपक्ष उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी दि. १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून फरार झाले होते. दाखल गुन्ह्यांमध्ये तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आला होता. तपास अधिकारी पीएसआय दत्तात्रय पोटे आणि त्यांच्या पथकाने कसून तपास करीत घटना उघडकीस आणली.(केसीएन) यामध्ये उमेदवार शेख अहमद हुसेन हे स्वतः मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा शिबान फैज अहमद हुसेन आणि मालेगाव येथील इरफान अहमद हुसेन या तिघांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांचा लहान मुलगा शेख उमर फारूक अहमद हुसेन आणि मालेगाव येथील गुन्हेगार मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा हे दोघे पसार झाले होते.
एलसीबीकडून त्यांचा शोध सुरूच होता. दरम्यान रविवारी दि. ८ रोजी ते मालेगाव येथे आल्याबाबतची माहिती मिळताच पथकाने मालेगाव गाठले. त्या ठिकाणी संशयित आरोपी शेख उमर फारूक अहमद हुसेन आणि बाबा उर्फ मोहम्मद शफीक शेख यांना ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्यांच्या ताब्यातील दुचाकी आणि गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे.(केसीएन)त्यांना सोमवारी दि. २ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना मंगळवार दि. १० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, हवालदार अक्रम शेख, हरिलाल पाटील, राहुल पाटील ईश्वर पाटील, चालक भरत पाटील यांनी केली आहे.