पुणे ( वृत्तसंस्था ) – पुण्यातील नर्हे येथील हेरंब हाईटसमध्ये पती – पत्नीच्या भांडणात दारुच्या नशेत असलेल्या पतीने झाडलेली गोळी लागून त्यांची ८ वर्षाची मुलगी जखमी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजनंदिनी पांडुरंग उभे असे जखमी झालेल्या मुलीचे नाव असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सिंहगड रोड पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक पांडुरंग तुकाराम उभे (वय ३८, रा. हेरंब हाईटस, नर्हे) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग उभे यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यातूनच त्याने परवाना असलेले रिव्हॉल्वर घेतले आहे. सध्या त्याचा व्यवसाय मंदीमध्ये असल्याने तो आर्थिक विवंचनेत असतो. त्याला दारुचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री तो दारु पिऊन घरी आला. त्यावरुन त्याच्यामध्ये व पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी पांडुरंग याने आपल्याकडील रिव्हॉल्वर काढून पत्नीवर उगारले. हे पाहून घरातच असलेली राजनंदिनी मध्ये पडली. दारुच्या नशेत असलेल्या पांडुरंगने रिव्हॉल्वरचा चाप ओढला. ती गोळी राजनंदिनीच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली. ती जागीच पडली. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारचे तातडीने तेथे आले.त्यांनी रक्ताच्या थोराळ्यात पडलेली राजनंदिनीला पाहून लगेचच भारती हॉस्पिटलला नेले. तेथे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. ही घटना समजताच सिंहगड रोड पोलीस तिथे पोहचले. त्यांनी राजनंदिनी हिला चांगले उपचार मिळावेत, यासाठी खासगी रुग्णालयात हलविले असून तिची प्रकृती स्थिर आहे. गोळीबार केल्यानंतर पांडुरंग हा घरातच होता. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.