जळगाव ( प्रतिनिधी ) – आजचे युग हे डिजिटल तंत्रज्ञानाचे असून या तंत्रज्ञानात वेगाने होत असलेल्या विकासात हार्डवेअर प्लॅटफॉर्म मधील अद्ययावत स्वयंचलित तंत्रज्ञान हे सर्वस्वी मूलस्थानी आहे. त्यात इंटरनेट ऑफ थिंग्स सोबत ऑर्डीनो मायक्रोकंट्रोलर हे सर्वात प्रभावी असे हार्डवेअर प्लॅटफॉर्म आहे. या अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे दिनांक १५ व १६ जून २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा. अनिलकुमार विश्वकर्मा (विभाग प्रमुख, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स) हे व्यासपीठावर उपस्थित होते.त्याचप्रमाणे दोन दिवसीय कार्यशाळेसाठी मार्गदर्शक वक्ते म्हणून प्रा. अनिल कुमार विश्वकर्मा, प्रा. विजय डी. चौधरी (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग), प्रा. हेमंत नेहेते (यंत्र विभाग), प्रा. नेमीचंद सैनी (विद्युत विभाग) हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन करून झाली.
सुरुवातीला प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनात होम ऑटोमेशन रोबोटिक्स, होम अप्लायन्सेस याबद्दल माहिती सांगताना वेगवेगळ्या मध्ये काम करणे आवश्यक आहे, तसेच विद्यार्थी स्तरावर ऑर्डीनो चा उपयोग करून संबंधित सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचे कौशल्य कमी वेळेत व उत्कृष्टपणे हस्तगत करून स्वयंचलित इलेक्ट्रॉनिक उपकरणे उत्पादित केले जाऊ शकतात असे नमूद केले. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या सत्रा मध्ये प्रा.अनिल कुमार विश्वकर्मा यांनी विद्यार्थ्यांना आय ओ टी म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
दुसर्या सत्रात प्रा. विजय चौधरी यांनी ऑर्डीनो मायक्रो कंट्रोलर याचे विविध प्रकार व रासबेरी पाय प्रोसेस, स्मार्ट प्रोजेक्ट एप्लीकेशन याबद्दल माहिती दिली. प्रा.हेमंत नेहेते यांनी रोल ऑफ सेंसर अँड मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस या विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी इंडस्ट्री १ पासून इंडस्ट्री ४ या औद्योगिक क्रांतीच्या इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांना अवगत केले.
पुढील सत्रामध्ये प्रा. नेमीचंद सैनी यांनी विद्यार्थ्यांना हँड्स ऑन प्रॅक्टिस घेऊन प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आले.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे हँडस् ऑन प्रॅक्टिस केली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवला. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रा. अनिल विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. हेमंत नेहेते व प्रा.नेमीचंद सैनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमाक्षी राणे व आभार प्रदर्शन सेजल सोनार या विद्यार्थिनींनी केले.