पुणे येथे विविध मान्यवरांच्या हस्ते झाला सन्मान
पुणे (वृत्तसेवा) : राष्ट्रसेवा व समाजकार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल व कायदा आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ॲड. महेश निळकंठ ढाके यांना “पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई प्रतिष्ठान, उरुळी कांचन, पुणे व राष्ट्र सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, पुणे येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभात नुकताच प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र भोळे होते. पुरस्कार प्रदान करताना सनराईझ इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे मॅनेजिंग डायरेक्टर एन. व्ही. चौधरी, भातृ मंडळ, पुणेचे सल्लागार कृष्णाजी खडसे, तसेच ज्येष्ठ साहित्यिक मुरलीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना अध्यक्ष डॉ. भोळे यांनी सांगितले की, “समाजातील दुर्बल घटकांसाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे ही प्रतिष्ठानची परंपरा आहे. ॲड. ढाके यांनी गेली दोन दशके ग्राहक हक्क, कायदा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.”
पुरस्कारस्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. आपल्या मनोगतात ॲड. महेश ढाके यांनी सांगितले की, “हा पुरस्कार माझ्या सामाजिक कार्याला मिळालेली मोठी पावती आहे. भविष्यात अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली आहे.” कार्यक्रमाला महाराष्ट्रातून अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.