जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त प्रवर्तन फाउंडेशनतर्फे जनजागृती
जळगाव (प्रतिनिधी) : शारिरीक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य चांगले असणे किती महत्त्वाचे आहे, या विषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, जळगाव येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘प्रवर्तन फाउंडेशन, नाडगाव’ या संस्थेने सादर केलेल्या प्रभावी पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाँ. गिरीष ठाकूर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित, प्राचार्य कविता नेतकर, प्राचार्य डाँ. पुष्पेंद्र निकुंभ, अधिसेविका संगीता शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना अधिष्ठाता डाँ. गिरीष ठाकूर म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्य जपण्याची गरज आहे. ‘प्रवर्तन फाउंडेशन’ने पथनाट्याच्या माध्यमातून अगदी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने हा विषय लोकांपर्यंत पोहोचवला आहे. विद्यार्थ्यांपासून ते वैद्यकीय कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी या उपक्रमातून प्रेरणा घेऊन मानसिक आरोग्याला प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले.
यावेळी मनोविकार विभागाच्या डाँ.शताक्षी वाघजाळे, डाँ.मनिषा महाजन, समुपदेशक विजयेंद्र पालवे यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या मनोविकार विभागाचे प्रमुख डॉ. यश महाजन, प्रवर्तन फाउंडेशनच्या अध्यक्ष दिव्या पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याला जनसमुदायाने भरभरून दाद दिली.