अधिष्ठात्यांनी केला डॉ. निलेश देवराज यांचा सन्मान
जळगाव : जामनेर येथील ऍड रेखा उर्फ विद्या राजपूत खून खटल्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालय जळगावच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे योगदान महत्वाचे राहिले. यामुळे मंगळवार दि १५ जून रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विभागाचे सहायक प्रा. डॉ. निलेश देवराज यांचा सन्मान केला.
जामनेर शहरात सुमारे दोन वर्षांपूवी १३ जानेवारी २०१९ रोजी ऍड. विद्या राजपूत यांचा खून झाला होता. त्या जळगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयात सरकारी वकील सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन येशील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झाले होते. प्रकरणात आरोपींनी स्वतःला वाचविण्यासाठी अनेक पळवाटा शोधल्या होत्या. या प्रकरणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. निलेश देवराज यांनी ‘शावैम’ येथे शवचिकित्सा केली. शवविच्छेदनावेळी, डोक्यात मध्यभागी मार लागल्याची खूण तसेच गळ्याभोवती सापडलेले फायबरचे तंतू या गोष्टी शवचिकित्सा वेळी पूर्णपणे जुळून आल्या होत्या. डॉ. देवराज यांनी जामनेर येथील घटनास्थळाचा अभ्यास करून त्यावर मयताच्या मरणाचे कारण तेथील परिस्थिती जन्य व वस्तुनिष्ठ पुराव्याच्या आधारे तपास यंत्रणेला सांगितले होते. या आधारे मयताचे पती व सासरे यांना अटक होऊन शिक्षा झाल्यामुळे मयत ऍड विद्या राजपूत याना न्याय मिळाला आहे.
प्रकरणात आरोपी पती हा डॉक्टर असून देखील त्याचे पितळ उघडे पडले. या महत्त्वपूर्ण प्रकरणात जीएमसीच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाची भुमिका महत्वाची राहिली. याबाबत डॉ. निलेश देवराज यांचा जिल्हा पोलीस दलातर्फे देखील सन्मान झाला. यामुळे महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ मारोती पोटे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन मंगळवार दि १५ जून रोजी सन्मान केला. यावेळी न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ वैभव सोनार उपस्थित होते.
” जामनेरच्या खून खटल्यात शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालय जळगावच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे योगदान न्यायव्यवस्थेला न्याय करण्यासाठी महत्वाचे ठरले. महाविद्यालयाचा हा विभाग अद्ययावत असून खुनासारखी गुंतागुंतीची प्रकरणे सोडविण्यामध्ये निष्णात झालेला आहे.”
– डॉ जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता