पाळधी तरसोद बाह्यवळण बायपास जवळची घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी नद्यांवर मोठी गर्दी झाली असताना एक दुर्दैवी घटना घडली. गिरणा नदीवर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या २७ वर्षीय तरुणाचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच ममुराबाद गावातील नातेवाईक व मित्र मदतीला धावून आले, तसेच तालुका पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; मात्र धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या मोठ्या विसर्गामुळे शोध कार्यात अडथळे आले. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा धरणात ९६ टक्के पाणी साठा झाल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून नदीत सुमारे ९७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आव्हाणे, वडनगरी, फुपनगरी, कानळदा परिसरातील गावांमध्ये शोध सुरू ठेवण्यात आला आहे.
गिरणा प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग आणखी वाढविण्यात येईल. त्यामुळे गिरणा नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभाग, चाळीसगावचे उपअभियंता यांनी दिला आहे.