एरंडोल तालुक्यात नागदुली येथील घटना, शिरपूरच्या कुटुंबावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यात शौचासाठी गेलेल्या पितापुत्रांपैकी ८ वर्षीय बालक हा गिरणा नदीच्या पात्रात खेळण्यासाठी गेला असताना पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना नागदुली येथे शनिवारी दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता घडली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कृष्णा नरेंद्र भिल (वय ८, रा. भामपूर ता. शिरपूर जि. धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. नरेंद्र भिल यांचा परिवार एरंडोल तालुक्यात मजुरीसाठी आला आहे.(केसीएन)शनिवारी दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शौचासाठी म्हणून नरेंद्र भिल हे मुलगा कृष्णा याला घेऊन नागदुली परिसरातील गिरणा नदीपात्राजवळ गेले होते. मात्र मला शौचास लागली नाही म्हणून कृष्णा हा नदीपात्राजवळ खेळायला लागला. काही वेळाने नदीकाठी गेल्यावर तेथे पाय घसरून पडल्याने तो बुडाला.
कृष्णाच्या वडिलांनि हे पाहिले व आरडाओरडा केला. तेव्हा ग्रामस्थ कैलास रमेश ठाकरे व युवराज अशोक देवरे यांनी कृष्णाला नदीच्या बाहेर काढून तत्काळ एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.(केसीएन)मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कृष्णाच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेमुळे शिरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. तर एरंडोल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ दिनेश पाटील करीत आहे.