चाळीसगाव एमआयडीसीसाठी प्रयोजन
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), चाळीसगावसाठी गिरणा नदीतील पाणी उद्या ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता सोडण्यात येणार आहे. गिरणा प्रकल्पातून १५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येईल. हे पाणी गिरणा धरणापासून जामदा बंधाऱ्यापर्यंत पोहोचेल. हे पाणी बिगर-सिंचन वापरासाठी असून, त्याचा वापर पिण्यासाठी केला जाईल.
यामुळे, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे. नदीतील पाण्याचे पंप बंद ठेवावे आणि काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. आपले पशुधन आणि इतर वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवावे. नदीपात्रात सुरू असलेले बांधकाम करणाऱ्यांनी आपली साधने आणि साहित्य योग्य ठिकाणी हलवावे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी ही माहिती दिली आहे.