जळगाव (प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील लोहारी-वरखेडे रस्त्यावर घरी जात असलेल्या माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या चारचाकी वाहनाला मागून धडक मारल्याने दुचाकीस्वार प्राथमिक आरोग्यकेंद्राचा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी २७ रोजी दुपारी घडली.
माजी मंत्री आ. गिरीश महाजन हे मुंबई येथील कामकाज आटोपून त्यांच्या घरी जामनेर येथे जात होते. दरम्यान त्यांचे वाहन पाचोरा तालुक्यात आले असतांना लोहारा – वरखेडे रस्त्यावर अचानक मागून एक दुचाकी स्वार त्यांच्या वाहनाला जोरदार धडकला. यात त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर मार लागला. यावेळी जखमीला मदत करण्यात कोणी पुढे येत नसल्यामुळे स्वत: आ. गिरीश महाजन यांनी जखमी तरुणाकडे धाव घेतली. हा तरुण प्राथमिक आरोग्य केंद्र, वरखेडी येथील आरोग्य कर्मचारी बी.सी.पवार असल्याची माहिती मिळाली.
यावेळी आ. महाजन यांच्यासह पिंपळगाव हरेश्वर येथील शिवसेनिक देविदास पाटील, भगवान पाटील, रवी गीते यांनी त्याला तात्काळ उचलले. आ. महाजन यांच्या वाहनात टाकून पाचोरा येथील विघ्नहर्ता रुग्णालयात त्याला पुढील उपचारासाठी दाखल केले. दरम्यान लोहारा – वरखेडी हा रास्ता प्रचंड खराब असून त्याने येथे खड्डे भरपूर आहेत. खड्ड्यांमुळे आ. महाजन यांचे वाहन हळू चालत होते. मात्र, रस्त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्याला वाहन चालवण्यात अडथळे आल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटून तो आ. महाजन यांच्या वाहनाला धडकला असावा अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.