जळगाव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या असून त्या सोडवाव्यात, जेणेकरून त्यांची काही दिवसांनी येऊन ठेपलेली दिवाळी गोड जाईल असे म्हणत माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या पदाधिकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी खासदार रक्षाताई खडसे उपस्थित होत्या.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही. त्यामुळे समस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असुन केळी पीक विमा काढण्याची मुदत सुद्धा संपलेली आहे. शेतकरी संभ्रमात आहे. तसेच शासन निर्णय २०२०-२१ मधुन केळी पिक विमा योजनेचे प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई मध्ये केलेल्या बदलामुळे शेतकरी बांधावामध्ये नाराजीचे वातावरण तयार झालेले आहे.
पुर्वी सलग ३ दिवस किमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास २५ हजार रु. देय होते. नविन जि.आर. नुसार सलग ५-७ दिवस किमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास ९ हजार रु. देय आहे. दिनांक ०१ ते ३१ मे २०२० सलग ५ दिवस ४५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त गेल्यास ४१००० रु. देय होते. नविन जि.आर. नुसार सलग ८ दिवस ४५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त गेल्यास १३५०० रु. देय आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काढलेला हा जि.आर. अन्यायकारक आहे.
दि. ०५ जुन २०२० रोजी लागू केलेली प्रमाणके ही कमी जादा तापमानात कधीही लागु होणार नाही आणि मागील सलग किमान ०५ वर्षाची तापमानाची आकडेवारी पाहता असे सलग कमी किंवा जादा तापमान कधीही दिसून आले नाही आज रोजी किमान २ ते ३ दिवस जरी तापमानात कमी जादा प्रमाणात बदल झाला तरीही केळी पिक पूर्णत: खराब होवुन जाते आणि केळी निसवणीवर गंभीर परिणाम होऊन उत्पादन कमी होते असे शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे, असेही निवेदनात नमूद आहे.
यावेळी आ गिरीष महाजन, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे , खा रक्षाताई खडसे,खा. उन्मेष पाटील, आ.मंगेश चव्हाण. आ.चंदुलाल पटेल, जिप अध्यक्षा रंजनाताई पाटील,लालचंद पाटील, सचिन पानपाटील, .भगत बालानी, राजेंद्र घुगे पाटील, राधेश्याम चौधरी, सुरेश धनके, पोपट भोळे, रावेर पंचायत समिती जितु पाटील, श्रीकांत महाजन, .यावल सभापती पुरुजित चौधरी, नारायण बापु , राजन लासुलकर, संदिप सावळे, सविता भालेराव, उज्वला माळके, निला चौधरी, . अमोल शिंदे, सुनिल काळे आदी उपस्थित होते.







