पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पाचोरा पोलिसांनी गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. आरोपीकडे २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस आणि एक रिकामी मॅगझीन असा ऐवज आढळला आहे.
आरोपीचे नाव समाधान बळीराम निकम (वय ३७) असून, त्याच्यावर यापूर्वी चाळीसगाव, फैजपूर आणि यावल पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गिरणा पंपिंग रोडवर एक सराईत गुन्हेगार वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली आणि तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक २२ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता घटनास्थळाकडे रवाना केले.
पोलिस पथकाने परिसराची कसून पाहणी केली असता, एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी संशय बळावल्याने त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला एक २० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा, १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस आणि २ हजार रुपये किमतीची एक रिकामी मॅगझीन आढळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. चौकशी अंती त्याचे नाव समाधान बळीराम निकम असून, तो मूळचा यावल तालुक्यातील अंजाळा येथील रहिवासी असल्याचे समजले.
पाचोरा येथील जाधववाडी येथे तो भाडेतत्त्वावर राहत होता. चौकशीत त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांच्यासह रणजित देवसिंग पाटील, राहुल शिंपी, योगेश पाटील, शरद पाटील, गणेश कुवर, श्रीराम शिंपी, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील आणि भूषण पाटील यांनी पार पाडली.