कांग नदीच्या पात्रात दुचाकीसह आढळला मृतदेह
जामनेर (प्रतिनिधी ) – येथील कांग नदीच्या पात्रात बोदवड रस्त्याच्या पुलाखाली बोदवडचा तरुण रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या दुचाकीसह आढळून आल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आली असून त्याचा अपघात झाला कि हत्या ? याचा अद्याप पोलिसांकडून उलगडा होऊ शकला नसून पोलीस अधिक तपास करीत आहे.
त्याचा मृतदेह जामनेर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, बोदवड येथील दत्त कॉलनी येथे राहणारा शुभम माळी धंदा – वाहन चालक वय अंदाजे २५ हा तरुण आज जामनेर शहरातील कांग नदीच्या पात्रात बोदवड रस्त्यावरील पुलाखाली मयत स्थितीत आढळून आला असून त्याच्या चेहऱ्यावर मार लागल्याच्या खुणा असून त्याची दुचाकी पल्सर क्रमांक एम.एच.१९ – डी २६३९ क्रमांकाची आढळून आली आहे. पोलिसांनी तपास केला असता सदर तरुण हा पहूर कडून बोदवडकडे जात असल्याची माहिती मिळाली. मयताच्या पश्चात चार बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि विधवा आई असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान मयत शुभम माळी याचा अपघात झाला कि हत्या याचा जामनेर पोलीस शोध घेत आहे. याबाबत जळगाव गुन्हे शाखेचे पथकही जामनेर मध्ये तपास करीत आहे.