धरणगाव तालुक्यात भंवरखेडे येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यातील भवरखेडे येथे घातक रसायनांपासून दूध तयार करून ते ग्राहकांना विकणाऱ्या एका तरूणाला अटक करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री केली. या प्रकरणी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, सुमारे ८० लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी दूध भेसळ तपासणी मोहीम देखील राबविली होती. त्या माध्यमातून विविध ठिकाणच्या खासगी डेअरींमधील दुधाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले होते. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतरही दूध भेसळीचे प्रकार थांबलेले दिसत नाही.(केसीएन)धरणगाव तालुक्यात भवरखेडा येथे सोमनाथ आनंदा माळी (वय ३१) हा तरूण आरोग्यास अपायकारक असलेल्या रसायनांचा वापर करून भेसळयुक्त दुध तयार करून ग्राहकांना राजरोसपणे विकत होता. त्याबाबतची माहिती जळगाव येथील अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांना मिळाली होती. त्याची खात्री करून त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्याला त्याविषयी माहिती दिली.
पोलीस कर्मचारी मदतीला घेऊन सोमवारी मध्यरात्री भवरखेडा येथे नियोजनबद्ध छापा टाकण्यात आला. तेव्हा सोमनाथ माळी हा रसायनांचा वापर करून दूध तयार करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली. अन्न सुरक्षा अधिकारी साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित सोमनाथ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्याजवळील सर्व रसायने जप्त करण्यात आली.(केसीएन)पोलीस उपनिरिक्षक संतोष पवार, हवालदार वर्षा गायकवाड तसेच धरणगाव पोलीस ठाण्यात हजर असलेले जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत उपनिरिक्षक जितेंद्र वलटे, हवालदार रवींद्र पाटील, दीपक माळी, विष्णू बिऱ्हाडे, बाबासाहेब पाटील यांनी कारवाईत भाग घेतला. जिल्ह्यात दूधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी दुधात भेसळ होत असल्याचे दिसून आल्यास तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.