एमआयडीसी पोलिसांनी लावला तपास
जळगाव (प्रतिनिधी) :- घरातून ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून तीन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील आर्वी येथून अटक केली. त्याला ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
प्रवीण दारासिंग पावरा (२१, रा. हिवरखेडा, ता. शिरपूर, जि. धुळे) असे चोरट्याचे नाव आहे. भुसावळ रस्त्यावरील एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहणारे कुंदन भटू सोनी यांच्याकडे एका धार्मिक कार्यक्रमासाठी नातेवाइक आले असल्याने रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय जागे होते. रात्री सर्वजण झोपलेले असताना चोरट्याने खिडकीतून घरात प्रवेश करीत १५ ग्रॅमची सोन्याची पोत व दोन मोबाइल असा एकूण ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नुकताच पोउनि शरद बागल यांच्याकडे दिला होता. त्यांनी पथकातील योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, गणेश ठाकरे यांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करीत प्रवीण पावरा याला आर्वी ता. धुळे येथील हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेला मोबाइल हस्तगत करण्यात आला. त्याला ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.