जळगाव शहरात श्याम नगर येथील घटना
श्याम नगर परिसरातील अंकित सूर्यभान पाटील (वय २४) हे खासगी नोकरी करतात. त्यांचे आई-वडील बाहेरगावी गेले असल्याने, ३० जून रोजी दुपारी अंकितने घराला कुलूप लावून त्याची चावी घराबाहेरच्या रांगोळीच्या डब्यात ठेवली आणि तो कामावर निघून गेला. याच संधीचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकले आणि देवघरातील पडदीवर ठेवलेल्या पिशवीतून तीन तोळे सोन्याची पोत व पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असे एकूण ७० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. रात्री अंकित पाटील घरी परतल्यावर ही चोरी झाल्याचे त्यांना समजले. अंकित पाटील यांनी तातडीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करत आहेत.