प्रधान सचिव डवले यांचा जिल्ह्यातील सरपंच, बीडीओंशी व्हिसीद्वारे थेट संवाद
जळगांव (प्रतिनिधी):-राज्याचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आज दि. १० जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जळगाव जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांशी संवाद साधत घरकुल योजना व इतर विविध ग्रामीण विकास योजनांचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १ लाख ४० हजार घरकुलांच्या उद्दिष्टांचे तातडीने पूर्णत्वासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
घरकुल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये, याकरिता त्यांनी प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांनी नियमित पातळीवर देखरेख व मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. विशेषतः, या बैठकीत डवले यांनी अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाचे सरपंच समाधान पाटील यांच्याशी थेट संवाद साधून घरकुल योजनेच्या गावातील प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत माहिती घेतली. गावपातळीवरील अडचणी व गरजा समजून घेत त्यांनी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देश दिले. या बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या घरकुल योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत पातळीवरील समन्वयातून तातडीने कृती होणे आवश्यक असून, यासाठी प्रत्येक गटाने उद्दिष्टपूर्तीसाठी सक्रिय पावले उचलावीत, असे आवाहन प्रधान सचिव डवले यांनी यावेळी केले.