पाचोरा पोलीस स्टेशनची कामगीरी
पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरात घरगुती गॅस हा इंधन स्वरूपात वाहनात भरण्यात येत असताना पोलिसांनी धडक कारवाई करुन एकास अटक केली आहे. त्याच्याकडून २१ गॅस सिलेंडरसह ८५ हजारांचे साहित्य पाचोरा पोलिसांनी जप्त केले आहे.
पाचोरा शहरात घरगुती गॅसचा कमर्शियल वापर करीत त्याचा इंधन म्हणून वाहनात भरण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिसांना प्राप्त झाली होती. हा प्रकार जारगाव चौफुलीजवळ एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता. याची शहनिशा करीत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी पथकाची नियुक्ती केली. या पथकाने या माहितीच्या आधारे पाळत ठेवत कारवाई करीत शुक्रवारी दि. १८ जुलै रोजी दुपारी तीन वाजता याठिकाणी धाड टाकली.
या धाडीत पोलीस पथकाला घरगुती वापराच्या गॅस २१ गॅस सिलिंडसह वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रिक मशिन (मोटार) व इतर साहित्यासह ८५ हजार रुपये किंमतीचे साहित्य आढळून आले. यावेळी गॅस सिलेंडर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच संशयित शेख शहेबाज शफुद्दीन (रा. नुरानीनगर, पाचोरा) याला रंगेहाथ पकडून अटक केली आहे. याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक पाटील, रणजीत पाटील, पोकॉ संदीप राजपूत, संदीप भोई, गणेश राऊळ यांच्यासह पथकाने धाड टाकून कारवाई केली. या परिसरात गेल्या चार महिन्यांतील चारवेळा कारवाई करुनही काही फरक पडत नसल्याने वारंवार कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.