जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील उद्यानात बेकायदेशीरित्या घरगुती गॅसचा काळाबाजार करून मालवाहू वाहनांमध्ये भरत असताना एकावर कारवाई केली आहे. त्याच्याकडून १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुरुवारी १६ मे सायंकाळी एमआयडीसी पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील मेहरूणजवळील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात बेकायदेशीररित्या रिक्षामध्ये व इतर वाहनांमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करून अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी गुरुवारी दि. १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता छापा टाकला. यावेळी घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या संशयित आरोपी सलीम शहा अरमान शहा (वय-३६, रा. तांबापुरा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडून जवळपास १९ हजार रुपये किमतीचे गॅस सिलेंडर, गॅस भरण्याचे साहित्य, वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश गरजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सलीम शाह अरमान शहा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.