जळगाव तालुक्यातील धानवड येथील घटना
जळगाव प्रतिनिधी – तालुक्यातील धानवड येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडून सुमारे ५ लाख ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भिका बळीराम पाटील (वय ५४) आणि साक्षीदार योगेश प्रभाकर मानके हे धानवड येथे राहतात. दि. २३ जानेवारी रोजी दुपारी १:०० वाजेपासून ते दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. फिर्यादी आणि साक्षीदार घरी नसताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटाचे कुलूप आणि तिजोरी तोडून ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी भिका पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करत आहेत. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.









