भुसावळ तालुक्यात जोगलखोरी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ तालुक्यात जोगलखोरी गावात घरामध्ये मातीने घर सावरत असताना एका महिलेला विषारी सापाने दंश केल्यामुळे गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. ३१ रोजी सकाळी ७. ३० वाजता घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सावित्रीबाई झेंडू वाघ (वय ५२, जोगलखोरी ता. भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या २ मुलांसह राहत होत्या. मुले शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत.(केसीएन)दरम्यान, गुरुवारी दैनंदिनीप्रमाणे वाघ परिवार सकाळी उठला. सावित्रीबाई ह्या घर सावरू लागल्या. त्यावेळी सकाळी साडेसात वाजता अचानक विषारी सापाने त्यांना दंश केला. कुटुंबियांना समजताच त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. यावेळी जिल्हापेठ पोलीस स्टेशनने रुग्णालयात पंचनामा करून प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे जोगलखोरी गावात शोककळा पसरली आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्प त्यांच्या बिळातून बाहेर निघतात. तेव्हा घराच्या आजूबाजूला, कडीकपारीतून वस्तू बाहेर काढताना सांभाळून राहा अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.