मुंबई ;- राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुण्यात वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यापाठोपाठ आता नवी मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. नवी मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.
याआधी नवी मुंबईत ३ जुलै ते १३ जुलैपर्यंत असा दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. नव्या निर्णयानुसार आता नवी मुंबईत १३ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते १९ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या कालावधीत पूर्वीप्रमाणेच नियम व अटी असणार आहेत, मात्र लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी नागरिकांनी लॉकडाूनच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहन पालिकेने केलं आहे.