
नांदेड, (वृत्तसंस्था)-‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती अभिनेता आशुतोष भाकरे (३३) याने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अजून समोर आलेले नाही. त्याने नांदेडमधील राहत्या घरी बुधवारी दुपारी गळफास घेतला. या घटनेने त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी आशुतोषने आत्महत्येसंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत माणूस आत्महत्येचे पाऊल का उचलतो याबद्दल सांगण्यात आले होते. त्यानंतर आशुतोषने हे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे
आशुतोषने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. २० जानेवारी २०१६ रोजी मयुरी आणि आशुतोष यांचा विवाह झाला होता. आशुतोष हा नांदेडमधील एका सुखवस्तू कुटुंबातला होता. जून जुलै या बहुचर्चित नाटकाची निर्मितीही त्याने केली. लॉकडाऊन काळात गेल्या दोन महिन्यांपासून हे दोघेही आपल्या गावी म्हणजे नांदेडला आले होते. नांदेड शहरातील गणेशनगर भागात त्यांचा बंगला आहे. दुपारच्या सुमारास तो झोपायला जातो असे सांगून गेला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत खोलीतून बाहेर न आल्याने पत्नी मयुरीने दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला.







