पुणे :;- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील यात्रा, आंदोलने तसेच मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या मंगळवारी अंगारकी चतुर्थी असून या दिवशी कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
अंगारकी चतुर्थीला दगडूशेठच्या दर्शनासाठी शहर व उपनगरांतून दरवर्षी ३ ते ४ लाख भाविक येतात. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. अंगारकीच्या दिवसासह इतरही दिवशी भक्तांकरीता ट्रस्टने अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.