मुंबई;- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती अर्थात बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप किशोर वाघ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्यावर असा आरोप केला जात आहे की, त्यांच्याकडे असणारे 90.24 टक्के संपत्ती ही बेहिशोबी आहे.
2016 मधील एका प्रकरणाच्या तपासादरम्यान ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे किशोर वाघ यांना पुन्हा एकदा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. किशोर वाघ यांच्यावर कलम 13 (1) (इ), कलम 13 (2) भ्रष्टाचार प्रतिबंध नियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर वाघ यांच्याकडे 1 कोटी 3 लाख 46 हजार 663 रुपये अधिकची संपत्ती आढळून आली आहे. शिवाय विविध शहरात असणारी त्यांची मालमत्ता बेहिशोबी असल्याचा आरोप देखील केला जात आहे.