जळगाव (प्रतिनिधी) ;- तालुक्यातील शिरसोली येथील रहिवाशी असलेल्या ५५ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मयताच्या नातेवाईकांनी एका खासगी हॉस्पिटलच्या प्रशासनाने औषधोपचार व्यवस्थित न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करीत गोंधळ घालून मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने याठिकाणी एकच गर्दी झाली होती.



याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , बीएसएनएल कार्यालयासमोरील गजानन हार्ट हॉस्पिटल येथे काल सायंकाळी ७-८ वाजेच्या सुमारास शिरसोली प्र. न. येथील चावदस शंकर ताडे वय -५५ यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ११ एप्रिल रोजी त्यांच्या हृदयात त्रास जाणवत असल्याने त्यांना जळगावातील आशीर्वाद हॉस्पिटल येथे व्हेंटिलेटरवर उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते .
मात्र त्यांची तब्येत आणखी खालावल्याने आणि त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना उपचारासाठी गजानन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते . तसेच त्यांची कोरोना चाचणीदेखील निगेटिव्ह आली होती . नेहमी प्रमाणे त्यांनी आज सकाळी साडेनऊवाजता चहा घेतला . मात्र यानंतर काहीवेळाने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताचे लहान बंधू आणि शिरसोली प्र. न.चे उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांनी चुकीची औषधी दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार केल्याने यावेळी मयताचे नातेवाईक आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यात वाद झाल्याने बराचवेळ गोंधळाचे वातावरण होते. यावेळी मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला . तसेच यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता मयत चावदस शंकर ताडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती . तसेच त्यांची ऑक्सिजन पातळी चांगली होती आज सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांची तब्येत चांगली होती . मात्र अचानक त्यांच्या रक्तात आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने हृदयक्रिया बंद पडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले . तज्ञ् डॉक्टरांनी रुग्नाला वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र दुपारी १ वाजून २० मिनिटांनी रुग्णाचा मृत्यू झाला . तसेच मयत रुग्णाचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कारासाठी नेत असल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी बोलताना दिली.







