भुसावळ;- थकबाकी वसूल करण्यासाठी नगरपालिकेतर्फे धडक मोहिम राबविली जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. थकबाकी न भरणार्यांच्या घरासमोर तुतारी व डफ वाजवून वसूली केली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली.
पालिकेची यंदा मालमत्ता थकीत कर वसूलीची मागणी ४० कोटी रुपये आहे. त्यात चालू वर्षीचे १५ कोटी तर गेल्या काळातील थकबाकी २५ कोटींची आहे. या बाबींचा विचार करता नगरपालिका प्रशासन आता धडक मोहिम राबविणार आहे.
यंदा अधिकाधिक थकबाकी वसूल व्हावी, यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. यंदा थकबाकीदारांच्या घरासमोर तुतारी व डफ वाजवणे, थकबाकीदारांच्या याद्या शहरातील मध्यवर्ती भागातील कट्ट्यावर तसेच गर्दीचे ठिकाणे व चौकांमध्ये चिटकवणे, थकबाकीदार गाळेधारकांवर कायदेशीर कारवाई करणे आदी कारवाई केली जाणार आहे यामुळे थकबाकीदारांनी आपल्या शहराच्या विकासासाठी तसेच सुविधा मिळण्यासाठी थकबाकी भरावी, असे आवाहन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आणि पालिका प्रशासनाने केले आहे.