जळगाव (प्रतिनिधी ) गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव, येथे यंत्र विभागामध्ये, अंतिम वर्षात शिकत असणारे विद्यार्थी अभिनीत भावसार, दीपक शुक्ला, मिहीर चौधरी, आणि वर्षा पाटील यांनी सायकलच्या पेडलचा वापर करून वाटर प्युरिफायर बनविले आहे.
सामान्यतः वाटर प्युरिफायर चालविण्यासाठी विद्युत ऊर्जेचा उपयोग केला जातो, परंतु काही दुर्गम भागांमध्ये, जिथे विद्युत पुरवठा पोहचू शकत नाही, अशा ठिकाणी, सदर यंत्र खूप उपयोगी पडू शकते. या यंत्रामध्ये पेडल द्वारे मिळणार्या मानवीय ऊर्जेचा उपयोग करून, त्याचे, विद्युत ऊर्जेत रुपांतर केले जाते व ती ऊर्जा बॅटरी मध्ये साठवली जाते. सदर संचित ऊर्जेचा गरजेनुसार वापर करून, त्यावर वॉटर पुरिफायर चालविले जाते. सदर वाटर प्युरिफायर ची क्षमता १ मिनिटाला २ ते ३ लिटर पाणी फिल्टर करण्याएवढी आहे. बॅटरी एक वेळ संपूर्ण चार्ज केल्यावर त्याद्वारे सदर फिल्टर, सतत ३ ते ४ तास काम करू शकते.
या प्रकल्पाची आखणी आणि बांधणी करताना विद्यार्थ्यांना प्रा. किशोर महाजन (मार्गदर्शक), तसेच विभाग प्रमुख प्रा. तुषार कोळी व प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.