शनिपेठ पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात मंगळवार दि. ३१ डिसेंबर रोजी दहशत माजविणाऱ्या मामा-भाच्याला शनिपेठ पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे. हे मामा-भाचे आसोदा रोडवरील मोहन टॉकीज जवळ रात्री अडीच वाजेच्या सुमारास देशी कट्टा तसेच हातात धारदार तलवार घेऊन भीतीदायक वातावरण निर्माण करत होते.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस शहरात नाकाबंदी व सक्त पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, असोदा रोडवरील मोहन टॉकीज जवळ दोन जण हातात शस्त्र घेऊन दहशत माजवीत आहेत अशी माहिती शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथक तयार करून दोघ मामा-भाच्याला शस्त्रांसह ताब्यात घेतले.
यात शाम साहेबराव सपकाळे (वय-३०) आणि त्याचा भाचा विशाल उर्फ सोनु धनराज सोनवणे (वय २०, दोघंही रा. आसोदा रोड, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. शाम सपकाळे याच्याकडून जीवंत काडतूसांसह गावठी पिस्तुल जप्त केल्यानंतर त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू सोनवणे याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्या दोघ मामा भाच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.