शनिपेठ पोलिसांची शंकरराव नगरात कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : – येथील शंकरराव नगर, डी.एन.सी. कॉलेजजवळील १०० फुटी रोड परिसरात दि. ०७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाला गावठी कट्टा बाळगून फिरत असताना पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
तरुण गावठी कट्टा (पिस्तूल) बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ. शशिकांत पाटील, पोहेकॉ. प्रदीप नन्नवरे, पोकॉ. रविंद्र सावळे, पोकॉ. निलेश घुगे, पोकॉ. नवजित चौधरी व पोकॉ. रविंद्र तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस पथक शंकरराव नगर परिसरात पोहोचले. तेथे गणेश पार्क चौकाजवळ दगडाच्या ढिगाऱ्यावर एक तरुण बसलेला दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच तो तरुण पळू लागला.
संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याने स्वतःचे नाव स्वप्निल उर्फ गोलू धर्मराज ठाकुर (वय २२, रा. शंकरराव नगर, डी.एन.सी. कॉलेज जवळ, जळगाव) असे सांगितले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली.(केसीएन)त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे मॅगझिन नसलेले पिस्तूल, तर पँटच्या खिशात एक मॅगझिन व त्यात ५ जिवंत काडतुसे असा २५ हजाराचा मुद्देमाल मिळून आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक रविंद्र साबळे यांनी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.