जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात पाठलाग करून पकडले
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथील तरुणाला शिवारामध्ये पाठलाग करून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या घरून २० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कुसुंबा शिवारामध्ये पथकाला पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार साई सिटी येथील कुसुंबा शिवारात पथकाने शोध घेतला असता एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळला. (केसीएन)त्याला विचारपूस करण्यासाठी जात असताना तो पळून जाऊ लागला. तेव्हा त्यास पाठलाग करून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव गाव विचारता त्याने चेतन वसंत देऊळकार (वय २२ रा. कुसुंबा ता. जळगाव) असे सांगितले. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्या राहत्या घरून काढून दिला आहे.
त्यानुसार गावठी बनावटीचा कट्टा एकूण २० हजार रुपयांचा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल तायडे, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गणेश ठाकरे, नितीन ठाकूर, विशाल कोळी यांनी केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहेत.