चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील मेहुणबारे गावात गेल्या अनेक दिवसांपासून उच्छांद मांडणाऱ्या व आतापर्यंत सात ते आठ जणांना चावा घेऊन जखमी करणाऱ्या माकडाला अखेर वन विभागाने आज शनिवारी दि. ५ रोजी जेरबंद केले.
गावात दहा ते बारा दिवसांपासून दहा- बारा माकडे दाखल झाली आहेत. त्यांच्या टोळीतील एक माकड काहीसे जखमी झाले होते. त्याच्या डोक्यावर जखमेची कोरडी खूण असून हे माकड अचानक कोणाच्याही अंगावर धावून जायचे. हे माकड चवताळल्यासारखे करीत असल्याने त्याची प्रचंड भीती निर्माण झाली होती. या माकडाने आतापर्यंत आठ ते दहा जणांना चावा घेऊन जखमी केले होते. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास स्वामी समर्थ केंद्रामागे सीताबाई चौधरी या वयोवृद्ध महिला रस्त्याने जात असताना त्यांच्या अंगावर माकडाने उडी मारुन पाडले. ज्यात त्या जखमी झाल्या होत्या.
माकडाने केलेल्या हल्ल्यात सुरेश सोनार, गोरख कोळी, भास्कर पाटील, कैलास ठोके यांच्यासह वरखेडे तांडा येथील एक जण तसेच बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या बाहेरगावच्या एकावर या माकडाने हल्ला करुन त्यांना चावा घेतला होता. या माकडाचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी दखल घेऊन शुक्रवारी पाचोरा येथील वन्यप्रेमी आतिष चांगरे यांना मेहुणबारेत पाठवले. त्यांनी चिंचेच्या झाडावर बसलेल्या माकडाला मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात अडकवले. वन विभागाने हे माकड ताब्यात घेतले असून माकडाला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती.