जळगाव तालुक्यात शिरसोली येथील मोहाडी रोडवर घटना, पशुपालकाचे २ लाखांचे नुकसान
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील शिरसोली येथील मोहाडी रोडवर गवत चरत असताना २ म्हशींना रस्त्यात पडलेल्या विजेच्या तारांमुळे जोरदार विजेचा धक्का बसून त्या जागीच मृत्युमुखी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दि. २९ जुलै रोजी सकाळी घडली आहे. यामुळे पशुपालकांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
भिकन नीलकंठ पाटील (वय ३१, रा. शिरसोली प्र. बो. ता. जळगाव) हे पशुपालन करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, मंगळवारी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची गुरे हि मोहाडी रस्त्यावरील मोकळ्या जागी चारण्यासाठी नेली होती. याठिकाणी विजेच्या काही तार उघड्या अवस्थेत पडलेल्या आहेत.(केसीएन)गवत चरता चरता २ म्हशींना तारांमुळे विजेचा जबर धक्का बसून त्या जागीच ठार झाल्या. यामुळे पशुपालकाने आरडाओरडा करीत शोक व्यक्त केला.
यावेळी ग्रामस्थांनी धाव घेऊन पशुपालक भिकन पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते उमेश रावसाहेब पाटील यांनी धीर देऊन सरपंच, पोलिसांना माहिती दिली. तसेच, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करीत पशुपालकांना सकाळी अर्ज घेऊन येण्यासाठी सांगितले आहे. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करीत घटना जाणून घेतली. दरम्यान, पावसाळयात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. महावितरण कंपनीने याबाबत शोधमोहीम हाती घेऊन तात्काळ तारा उचलाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.