जळगाव तालुक्यातील असोदा येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील असोदा येथील विवाहितेचा धरणगाव तालुक्यातील अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २४ जानेवारी रोजी घडली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
धनश्री गोपीचंद पाटील (वय २८, रा. असोदा ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या पती गोपीचंद, दोन मुले, सासू-सासरे यांच्यासह असोद्यात राहत होत्या. पती गोपीचंद हे फर्निचर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही कामानिमित्त ते मंगळवारी २३ रोजी सकाळी धुळे येथे गेले होते. तेथून परतत असताना धरणगाव तालुक्यातील चिंचपुरा गावाजवळ संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांचा भीषण अपघात झाला. रस्त्यात अचानक स्पीडब्रेकर आल्याने ब्रेक लावल्यावर वाहनावरून दोघे खाली पडल्यावर धनश्री पाटील ह्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. यात त्या जबर जखमी झाल्या.
त्यांना जळगावात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. त्यांची दोन मुले मातृप्रेमाला पोरकी झाली आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी अकस्मात मृत्यूची नोंद करीत होते.