विखूरलेल्या मोत्यांपासून मोत्यांची माळ बनते, मात्र ती एका धाग्यात गुंफली जाते, तेव्हाच माळ बनते. त्याचप्रमाणे चांगल्या आचरणातून एक-एक चांगल्या गुणांचा, मुल्यांचा अंगिकार करुन तसे ‘आचरण’ केले तर मनुष्याचे चारित्र्य घडते. आपले आचरण हे आत्माला दिशा देणारे असावे. ‘गती’ आणि ‘प्रगती’ यात फरक आहे. ‘गती’ ला दिशा असतात आणि चरण आवश्यक असते तर ‘प्रगती’ ला एकच दिशा असते आणि यात ‘आचरण’ खूप मोलाचे असते. ज्यांचे आचरण शुद्ध विवेकपूर्ण ते प्रगती साधू शकतात. ‘जीनवाणी’चा सारांश म्हणजे शुद्ध आचरण होय. आजच्या परिस्थितीत चित्र, फोटो याला महत्त्व दिले जाते, मात्र चारित्र्यावर काम केले जात नाही. चित्र सुंदर करण्यासाठी प्रयत्नपूर्वक वेळ घालविला जातो. मात्र चारित्र्य निर्माण करण्यासाठी मनुष्याजवळ वेळ दिसत नाही. पुर्वी धनापेक्षा चारित्र्याला महत्त्व होते तर आता चारित्र्यापेक्षा धनाला महत्त्व दिले जाते. असे स्पष्ट विचार धर्मसभेत शासनदीपक प.पु.सुमितमुनिजी महाराज यांनी श्रावक-श्राविकांसमोर मांडले.
‘संवत्सरी पर्वा’ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सहनशील झाले पाहिजे. शत्रुलासुद्धा आपला मित्र बनविता येईल, असी कृती आपल्या हातून घडली पाहिजे. दुसऱ्यांविषयी असलेले वैरत्व संपविले पाहिजे. क्षमायाचना केली पाहिजे. आपली चुक किंवा नसेल तरीसुद्धा क्षमायाचना केली पाहिजे. क्षमा करणे व क्षमा मागणे ही दोघंही कृती ईश्वर प्राप्तीचा मार्ग मिळवून देणारी आहे. असे विचार आरंभी परमपूज्य प. पु. भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी व्यक्त केले.
‘पर्यूषण पर्वा’ निमित्त प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी ‘अंतगडदसा’ सूत्राचे वाचन केले. यात उपासना, तपस्याचे महत्त्व समजून सांगितले. शरिरासाठी आपण सर्व काही करतो मात्र मन:शांतीसाठी काहिही करत नाही. आध्यात्मिक आरोग्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. आत्मसमाधानासाठी सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे, त्यातूनच परिवर्तन घडते. इंद्रियांवर नियंत्रण ठेवून स्क्रिन टाईम कमी करणे, आत्मानुशासन म्हणजे स्वत:चे स्वत:वर नियंत्रण ठेवणे. विवाद व विग्रह टाळून संवाद घडविला पाहिजे. वैर आणि ईर्ष्या संपवून ‘मैत्रीभाव’ विकसीत केला पाहिजे. स्वत:च्या जीवनात नियमावलीनुसार जगले पाहिजे. प्रेम, वात्सल्य, मैत्रभाव वाढविण्यासाठी सामुहिक, पारिवारिक साधना, प्रार्थना केली पाहिजे. यातूनच करुणाभाव विकसीत होतो, सुरक्षा कवच निर्मित होते असे प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म्हणाले.