जळगावातील शनिपेठ पोलीस स्टेशनला हाणामारी प्रकरण
जळगाव ( प्रतिनिधी ) – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील गटारीच्या कामाच्या टेंडर भरण्याच्या कारणावरून माजी नगरसेवक कैलास सोनवणे आणि राहुल ठाकरे गट यांच्यात शनिवारी दुपारी जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्या असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

या वादाची ठिणगी जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालापासून पडली असल्याचे समोर आले आहे. प्रभाग ३ मधून कैलास सोनवणे यांची मुलगी प्रतीक्षा सोनवणे (भाजप) आणि राहुल उर्फ मोगली ठाकरे यांची पत्नी चैताली ठाकरे (अपक्ष) यांच्यात लढत झाली होती. फेर मतमोजणीत चैताली ठाकरे यांचा १३० मतांनी पराभव झाला होता, तेव्हापासून दोन्ही कुटुंबांत तणाव होता.
“पोलिस ठाण्यातच खुर्चीला लाथ मारून पाडले”
माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रभाग ३ मधील कामाचे टेंडर बाहेरच्या ठेकेदारांनी भरल्याबाबत त्यांनी विचारणा केली होती. याचा राग धरून राहुल उर्फ मोगली ठाकरे याने फोनवरून शिवीगाळ केली. यानंतर कैलास सोनवणे हे जाब विचारण्यासाठी ठाकरे यांच्या घरी गेले असता तिथे निलेश ठाकरे व रितेश ठाकरे यांनी वाद घातला. दुपारी ३:४५ च्या सुमारास राहुल उर्फ मोगली ठाकरे, निलेश ठाकरे, रितेश ठाकरे, हितेश ठाकरे व इतर दोघांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. यात विशाल सोनवणे आणि सागर सोनवणे जखमी झाले.
धक्कादायक बाब म्हणजे, शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत असताना राहुल ठाकरे याने कैलास सोनवणे यांच्या खुर्चीला जोरात लाथ मारली, ज्यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला टेबल लागून दुखापत झाली. त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
“घरात घुसून केली शिवीगाळ”
दुसरीकडे, छाया डीगंबर उर्फ शैलेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कैलास सोनवणे यांनी समर्थकांसह त्यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला. कैलास सोनवणे, विलास सोनवणे, सागर सोनवणे, कल्पेश सोनवणे व इतर दोन अनोळखी व्यक्तींनी घरात घुसून “टेंडर का भरले?” असे विचारत वाद घातला. शनिपेठ पोलीस चौकीजवळ जात असताना कैलास सोनवणे आणि त्यांच्या समर्थकांनी ‘बेकायदेशीर मंडळी’ जमा करून ठाकरे कुटुंबातील सदस्यांना लाथाबुक्क्यांनी आणि चाबकाने मारहाण केली.
या हाणामारीत पती डीगंबर ठाकरे आणि मुलगा हितेश ठाकरे जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
शनिपेठ पोलिसांनी दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. एका बाजूने कैलास सोनवणे यांच्या तक्रारीवरून राहुल ठाकरे व इतरांविरुद्ध, तर दुसऱ्या बाजूने छाया ठाकरे यांच्या तक्रारीवरून कैलास सोनवणे व त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भरदिवसा आणि पोलीस स्टेशनच्या आवारात झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.









