एमआयडीसी पोलिस स्थानकाची कारवाई, १ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गॅस रिफिलींग व काळा बाजारातील गॅस विक्री करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक करुन त्याच्याविरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून १ लाख ६४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ८ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनीत किरण भागवत पाटील या व्यक्तीने घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायिक सिलेंडरमध्ये रुपांतरीत करून त्या सिलेंडर्सचा वापर करून काळा बाजार सुरू केला होता. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवले. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले. हे पथक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली अशोक काळे, राजेंद्र कांडेकर, हेमंत जाधव, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर, आणि योगेश घुगे यांच्या सहकार्याने आरोपीच्या घरावर छापा मारला.
छाप्यात पोलिसांनी ५४ गॅस सिलेंडर जप्त केले. यामध्ये २२ घरगुती सिलेंडर, ३२ व्यवसायिक सिलेंडर, आणि एक इलेक्ट्रिक प्रेशर मोटर (ज्याचा वापर गॅस रिफिलींगसाठी केला जात होता) समाविष्ट होते. या सगळ्या वस्तूंची एकूण किंमत १ लाख ६४ हजार रुपये आहे. पोलिसांनी संशयित आरोपी किरण पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची पोलिस कस्टडी ११ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने जनतेला आवाहन केले आहे की, जर कोणी अशा प्रकारे अवैधरित्या गॅस रिफिलींग किंवा विक्री करत असल्यास, तत्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती देऊन सहाय्य करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, अशोक काळे, राजेंद्र कांडेकर, हेमंत जाधव, योगेश बारी, सिद्धेश्वर डापकर आणि योगेश घुगे यांनी केली आहे.