जळगाव ( प्रतिनिधी ) – मनसेची स्थापना झाली तेंव्हा सर्वधर्म समभावचा नारा होता, नंतर त्यांनी परप्रांतीयांच्या कानफ़ाट्यात मारली, झेंडा बदलला. पुन्हा मराठीपणा आणला. आज ते म्हणतात की गर्वसे कहो हम हिंदू है. गर्वसे कहो हम हिंदू है असे आमचे बापजादे म्हणत होते, ही सर्व शिवसेनेची पिलावळ आहे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी मनसेला सुनावले.
जे स्वतः स्टेबल नाही त्यांनी शिवसेनेला गर्व से कहो हिंदू है म्हणू नये. राजकारणात कोठही थारा नसल्याने आता हिंदुत्वाकडे वळावे म्हणून नवीन पायत्रा त्यांनी काढला असल्याची टीका शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसेवर केली.
जळगाव महापालिकेत भाजप पुन्हा बहुमतात आला आहे, तर त्यांनी महापौर बदलून दाखवावा… असे थेट आव्हानही गुलाबराव पाटील यांनी दिलंय.. भाजपच्या नगरसेवकांनी गटनेतेपदाच्या नोंदणीसाठी दोन्ही पक्षांकडे नोंदणी केली आहे, असेही ते म्हणाले…
शिवसेनेचा आज दसरा मेळावा होत आहे, ही परंपरा आहे. पण आज 35 वर्षांनी मी दसरा गावाकडे साजरा करणार आहे, असेही ते म्हणाले
जिल्हा रूग्णालयात रुग्णवाहिकांचा लोकार्पणांनंतर ते बोलत होते. मनसेने मुंबईत केलेल्या बॅनरबाजीवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. मंत्री पाटील म्हणाले, की आमचा बापजादा १९६६ पासून हिंदुत्वाची भाषा बोलत आहे. त्यांचीच ही पिलावळ आहे. ज्यांनी ही बोलण्याची भाषा केली आहे. त्यावेळी आम्हाला वेड्यात काढले, पण पहिले बाळासाहेब ठाकरे होते जे हिंदुत्वावर बोलणारे होते. त्या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला हिसकावण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचेदेखील ते म्हणाले.
जिल्हा बँकेच्या निवडणूकसाठी सर्वपक्षीय पॅनलबाबत प्रयत्न सुरू आहे. कॉंग्रेस वेगळी लढतेय याबाबत जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही. एक व्यक्ती बोलत आहे. पुर्ण पक्ष बोलत असेल तर आम्हीही तोडायला तयार आहे. सगळ्यांनी बसून सांमजस्याने ठरविले होते. बिनविरोधचा प्रयत्न केला होता. तिच प्रथा आता चालू ठेवली आहे. एकमत होत नसेल तर शिवसेनाच काय तर प्रत्येक पक्ष वेगळा लढेल. शिवसेनेची स्वबळाची तयारी आहे. बँक अ वर्गात ठेवायची असेल तर निवडणूक बिनविरोध होण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले.