जळगावच्या जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागाची सुविधा
जळगांव (प्रतिनिधी) : गरोदर मातांना प्रसूतीसंदर्भात कोणतीही अडचण भासू नये, त्यांची प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सक्षम संस्थेतच व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जळगाव तर्फे टोल फ्री क्रमांक ८२३७३५३१९३ हा कार्यान्वित करण्यात आला आहे.
या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून गरोदर माता व त्यांचे कुटुंबीय खालील बाबींमध्ये त्वरित मदत मिळवू शकतात. प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास, रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यास, आवश्यक औषधे व उपचार उपलब्ध नसल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ही सेवा २४x७ उपलब्ध असून गरोदर मातांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी कोणत्याही वेळी या क्रमांकावर संपर्क साधावा.
माहे सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील जवळपास २,५०० अपेक्षित प्रसूती गरोदर मातांची यादी आरोग्य विभागाकडून मागविण्यात आली होती. त्यापैकी सुमारे २,०१२ गरोदर मातांना थेट फोनवर संपर्क साधून विचारपूस करण्यात आली आहे. गरोदर मातांची सुरक्षित प्रसूती व योग्य आरोग्य सेवा ही जिल्हा परिषद आरोग्य विभागाची सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक गरोदर मातेला आवश्यक सेवा वेळेवर मिळावी यासाठी या टोल फ्री सेवेला जिल्ह्यातील नागरिकांचा सक्रिय प्रतिसाद मिळावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी केले आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या विविध सुविधांचे लाभ घेणे सहज सोपे होणार आहे. एकाच क्रमांकवर आरोग्य शी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याने या सुविधेमुळे अनेक अडचणी सोडविणे शक्य होणार आहे.









