जळगाव ( प्रतिनिधी ) – शतपावलीसाठी पायी चालणाऱ्या ८ महिन्यांच्या गर्भवती महिलेस दारूच्या नशेत असलेल्या दुचाकीस्वाराने समोरून धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना वावडदा ते म्हसावद मार्गावर घडली या महिलेच्या कुटुंबियांनी दोषीवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात तणाव वाढला होता.
वावडदा येथील ज्योती दीपक गोपाळ (वय २१) ही गर्भवती महिला तिच्या मीना आणि दीपाली या दोन्ही नणंदांच्या सोबत वावडदा ते म्हसावद रोडवर शतपावली करत होत्या. सुपडू विक्रम जाधव (रा. वावडदा, ता. जळगाव) हा दुचाकीस्वार भरधाव वेगाने आला. त्याने ज्योतीला समोरून जोरदार धडक देऊन तिला २५ फुटांपर्यंत फरफटत नेले. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. संबंधीत दुचाकीस्वार दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. आज सकाळी ज्योती गोपाळ हीचा मृतदेह जिल्हा रूग्णालयातून स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला दोषीवर कठोर कारवाई होत नाही तोवर मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर आरोपीच्या कुटुंबीयांनी मयत महिलेच्या २ नणंदांसह , सासूला त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत धमकावले . ज्या दुचाकीने धडक दिली ती आरोपीच्या कुटुंबीयांनी लपवली असल्याचे सांगण्यात आले . आरोपीचे कुटुंबीय त्यानंतर फरार झाले आहे . आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . मारहाण झाली तेंव्हा त्यांच्या घरात कुणीही पुरुष नव्हते एम आय डी सी पोलीस ठाण्यात या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपीने जाणीवपूर्वक माझ्या भावजयीला मारून टाकण्यासाठीच वाहनांची धडक दिल्याचा आरोप या महिलेच्या नणंदांनी केला आहे .