चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे ग्रामीण पोलिसांची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमगव्हाण येथे गांजाची तस्करी करणाऱ्या एका तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी १ लाख ३४ हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.
चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. चोपडा ते धरणगाव मार्गावरील निमगव्हाण बसस्थानकाजवळ संशयित हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी एका स्कूटीस्वाराला थांबवले.
पोलिसांनी संशयित आरोपी अमित दिलीप बरडे (वय २२, रा. दोंदवाडे जोगवाडा, ता. नेवाली, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याची तपासणी केली असता, त्याच्याकडे एका पिवळ्या प्लास्टिकच्या पिशवीत ७९,००० रुपये किंमतीचा ७ किलो ९१८ ग्रॅम गांजा आढळून आला. तसेच, पारदर्शक प्लॅस्टिकच्या पिशवीत ५५,००० रुपये किंमतीचा ५ किलो ५६५ ग्रॅम गांजा देखील सापडला. पोलिसांनी आरोपी आणि गांजा वाहतुकीसाठी वापरलेली टीव्हीएस ज्युपिटर (क्र. एमपी ४६- झेडसी ६४४३) स्कूटी आणि आयफोन १५ मोबाईल जप्त केले आहेत. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, तो गांजा कुठून आणला आणि कुणाला पुरवठा करणार होता, याचा तपास सुरू आहे.