गांजातस्कराला ३ लाखांच्या मुद्देमालासह अटक, एरंडोल तालुक्यात कासोदा पोलिसांची कामगिरी
एरंडोल (प्रतिनिधी) : येथील कासोदा पोलीस ठाणे हद्दीत गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी विशेष मोहिम राबवून १९ किलो गांजा आणि मोटारसायकलसह एक तस्कराला अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक निलेश राजपूत आणि त्यांच्या पथकाने मागील पाच दिवसांपासून वेशांतर करून गांजा विक्रेत्यांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. पहिल्या ४ दिवसांत कोणतेही यश मिळाले नाही. (केसीएन)मात्र, २५ फेब्रुवारी २०२५ रोजी पेट्रोलिंगदरम्यान वनकोठे गावाजवळ पोलिसांना मोठे यश मिळाले. एरंडोलहून कासोदा दिशेने येणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका संशयित व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सापळा रचला. दुचाकीवर प्लास्टिकच्या गोणीत गांजा घेऊन जाणाऱ्या इसमाचा पाठलाग करून त्याला अडवले.
तपासणीअंती त्याच्या गोणीत खाकी रंगाच्या टेपने पॅक केलेले चौकोनी आकाराचे पुडे आढळले. त्यांची तपासणी केली असता १९ किलो गांजा आढळला. त्यावरून संशयित अजय रविंद्र पवार (वय २७, रा. सोनबर्डी, ता. एरंडोल) याला अटक करून त्याच्याकडील १९ किलो गांजा आणि दुचाकी असा एकूण २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोहेकॉ. नंदलाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या संशयिताला न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.(केसीएन)ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश राजपूत, पोउनि दत्तू खुळे, पोहेकॉ नंदलाल परदेशी, पोना अकील मुजावर, किरण गाडीलोहार, नरेंद्र गजरे, पोकॉ समाधान तोंडे, लहु हटकर यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि निलेश राजपूत करत आहेत.