जळगाव ( प्रतिनिधी ) – आज न झालेल्या गांजाच्या कारवाईने एरंडोल पोलिसांवर ‘ एरंडोलचा गांजा ‘ चढला कुणाला ? ; बातमी देणारांना की व्हायरल करणारांना ? … याचाच शोध घेण्याची वेळ आली होती !

त्याचे असे झाले की , मुंबई येथील एन.सी.बी. पथकाने मांजरम ( ता – नायगाव , जि – नांदेड ) येथे आज पहाटे सापळा रचून अंदाजे ९ कोटी रुपये किमतीचा गांजा पकडल्याची माहिती समोर आली .
एन.सी.बी. पथकाने एम एच २६ – ए डी – २१६५ क्रमांकाच्या बारा टायरी ट्रकमध्ये 15 क्विंटल गांजा पकडला . या संबंधित पथकाला गजानन पाटील माजी सरपंच व पदाधिकारी यांनी सहकार्य केले . अशी आहे मूळ घडलेली कारवाईची घटना . इकडे जळगावात मात्र या कारवाईची बातमी एरंडोल पोलिसांच्या मुळावर आली !
जळगावात सोशल मीडियावर ‘ एरंडोल येथे १५०० किलो गांजा जप्त ! ‘ अशी बातमी व्हायरल झाली . आणि एरंडोल पोलीस कामाला लागले ! त्यांनी एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सगळीकडे चौकशी सुरु केली . चौकशीत असे काही घडलेच नसल्याचे निष्पन्न झाल्यावर एरंडोल पोलिसांचा जीव भांड्यात पडला .
एरंडोल पोलीस ठाण्याचे स पो नि देवरे यांनी नंतर हा खुलासा केला . मात्र अशी एरंडोलचा ‘ नसलेला ‘ संदर्भ देत बातमी व्हायरल झालीच कशी ? , हा नवा प्रश्न पोलिसांना सतावतो आहे .







