शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाला यश
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जीबीएस आजाराने बाधित गंभीर बालकावर यशस्वी उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल बालरोग विभागाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.
रावेर तालुक्यातील नांदूरखेडा येथील ११ वर्षीय बालिका सोनाली पाटील हिला हातापायांच्या कमजोरीमुळे शरीराची हालचाल करण्यास आणि वस्तू पकडण्यास कमजोरी जाणवत होती. तसेच श्वास घेण्यास त्रास होत होता. सदर बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग व चिकित्सा शास्त्र विभागाअंतर्गत अत्याधुनिक बालरोग अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. विविध तपासण्या केल्यानंतर सदर बालिकेला जीबीएस म्हणजेच गुलियन बारे सिंड्रोम या आजाराचे निदान झाले. या बालिकेला श्वसनाचा त्रास आणि गिळायला त्रास असल्यामुळे तात्काळ व्हेंटिलेटर लावण्यात आले. दरम्यान, तिला न्यूमोनिया असल्याचे देखील निदान तपासणीत झाले. सदर बालिकेवर सातत्याने २१ दिवस बालरोग तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट आदी तज्ज्ञांच्या एकत्रित परिश्रमाने यशस्वी उपचार करण्यात आले.
७ दिवसानंतर सदर बालिकेचे व्हेंटिलेटर निघून तिला ऑक्सिजन लावण्यात आला. या आजारामुळे होणारे संभाव्य धोके यशस्वी उपचारामुळे दूर झाले. २१ दिवसाच्या अथक उपचारानंतर सदर बालिकाला पूर्ववत हालचाल करण्यास, श्वास घेण्यास सोपे झाले. यानंतर सदर बालिकेला १५ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सदर बालिकेवर अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे, सहाय्यक प्रा. डॉ. गिरीश राणे, डॉ. इंद्राणी मिश्रा, इन्चार्ज परिचारिका श्रद्धा सपकाळ आणि संगीता शिंदे यांच्या सर्व वैद्यकीय पथकाने, कर्मचारी वर्गाने यशस्वी उपचार होण्यासाठी परिश्रम घेतले.
जीबीएस व इतर कोणताही गंभीर आजार असल्यास तत्काळ वेळेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग विभागात उपचारासाठी यावे. आपल्याकडे अद्ययावत सुविधा व तज्ज्ञ टीम असल्याने रुग्ण वाचविण्यास मदत होते, असे विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी सांगितले.