पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव चौफुली परिसरातील रहिवासी असलेल्या ऊसतोड मजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोरा शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुनील सुरेश उदागे (३२, वरखेडी नाका, जळगाव चौफुली, पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, २ लहान मुले, १ मुलगी व आई, बहीण, भाऊ असा परिवार आहे. त्याने घरी कुणीही नसताना दुपारी ४:३० च्या सुमारास राहत्या घरी रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील हा ऊसतोड कामगार व वाहन चालक होता.
गेल्या महिन्याभरापासून सुनील हा ऊसतोड कामावरून घरी परत आला होता. त्याची पत्नी व लहान २ मुले, मुलगी हे बारामती साखर कारखान्यात ऊसतोडणीसाठी गेलेले आहेत. सुनील हा आई व बहीण यांच्यासोबत राहत होता. आई व बहीण हे बाहेर गेल्याची वेळ साधून त्याने छताला रुमाल बांधून गळफास घेतला व जीवन संपवले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आली. पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.