चाळीसगावातील पाटबंधारे विभागातील घटना
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- मन्याड प्रकल्पातील गाळ वाहतूक करू देण्याच्या मोबदल्यात १३ हजार ३०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी चाळीसगाव पाटबंधारे विभागातील लिपिकाला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी १५ डिसेंबर रोजी अटक केली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दप्तर लिपिक तुषार अशोक पाटील (३६) असे लाचखोराचे नाव आहे. धुळे एसीबीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता अटक केली. नांदगाव, जि. नाशिक येथील २३ वर्षीय तक्रारदार यांचा ट्रक्टर व शेतीचा व्यवसाय आहे. तक्रारदार यांना त्यांच्या आजोबांच्या शेतीमध्ये गाळ टाकण्यासाठी मन्याड धरण प्रकल्पातून गाळ वाहतुकीची परवानगी हवी होती. लिपीक तुषार पाटील यांनी ३० सप्टेंबर रोजी १३ हजार ३०० रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. मात्र लाच सापळ्याचा संशय आल्याने लिपिकाने लाच स्वीकारली नाही. मात्र लाच मागणी अहवाल आल्यान संशयिताला शुक्रवारी सकाळी ११ वाजता अटक करण्यात आली. संशयिताविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्या आला.
लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, एपीआय रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर कार्यवाही केली.