जळगाव शहरातील गोपाळपुरा भागातील घटना
जळगाव प्रतिनिधी शहरातील गोपाळपूरा भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर पंख्याला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
हेमांगी तुषार अहिरे (वय २२ रा. गोपाळपूरा, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. जळगाव शहरातील गोपाळपूरा भागात हेमांगी अहिरे ही विवाहिता पती व सासरच्या मंडळींसोबत वास्तव्याला होती. बुधवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता हेमांगी ही कामाच्या निमित्ताने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. तिने दरवाजा आतून बंद करून पंख्याला साडीच्या मदतीने गळफास घेवून आत्महत्या केली. उशीरापर्यंत हेमांगी ही खाली न आल्याने तिची सासू तिला पाहण्यासाठी वर गेली असता दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर खिडकीतून पाहिले असता हेमांगीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. यावेळी तिच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. यावेळी तिच्या माहेरचे आणि सासरचे मंडळींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.









